गडचिरोली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 20 जुलैला राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

63

– गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १९ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने गुरुवार, 20 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आज जारी केला आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडीया, पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, अंगणवाडी, महाविद्यालये 20 जुलै रोजी बंद राहतील. मात्र इतर सर्व कार्यालये, आस्थापना आणि दुकाने सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष संजय मीणा यांनी जारी केले आहे. सदर आदेशाचे पालन न करणारी तसेच उल्लंघन करणारी व्यक्ती व संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.