विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी दिड हजार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेच्या (एमपीएससी) पुस्तकांचे वाटप करण्यात आली. यानिमित्त यानिमित्ताने स्थानिक आरमोरी मर्गावरील संस्कृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. किरसान यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, माजी खासदार मारोतराव कोवासे, कॉंग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटाराम तलांडी, डॉ. नितीन कोडवते यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री पुरके म्हणाले, युवक- युवतींनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ठेवून तयारी केल्यास यश नक्की पदरी पडेल. या आदिवासी जिल्ह्यांमधून आयएएस, आयपीएस अधिकारी झाले पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी आमदार अभिजित वंजारी, आमदार अडबाले यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात डॉ. किरसान यांनी आदिवासीबहुल भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळावी याकरिता त्यांना तयारी करण्यासाठी अद्यावत सामान्य ज्ञानाची माहिती असलेले पुस्तक फायदेशिर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. नामदेवराव किरसान यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या सत्कार व अभिष्टचिंतन करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे संचालन सुनील चडगुलवार यांनी तर आभार प्रदर्शन सतीश विधाते यांनी केले. या कार्यक्रमाला सतीश वारजुरकर, प्रकाश ईटनकर, वामनराव सावसाकडे, डॉ. चंदा कोडवते, मनोहर पोरेटी, दामदेव मंडलवार, प्रभाकर वासेकर, प्रा. राजेश कात्रटवार, रमेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.