कार्यकर्त्यांच्या बळावर गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत करू : अनिल देशमुख

39

– गडचिरोलीत पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पक्षात कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो. या कार्यकर्त्यांच्या बळावर गडचिरोली जिल्ह्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करू आणि पुन्हा जोमाने काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

स्थानिक चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉनमधील सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक राजेंद्र वैद्य, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे, ज्येष्ठ नेते श्याम धाईत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली शहराध्यक्ष विजय गोरडवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वतःच्या बळावर खासदार, आमदार निवडून आणू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. इडी, सीबीआय अशा चौकशीचा धाक दाखवून पक्ष फोडण्याचे काम केले जात आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली असून आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांना खरा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी अतुल गण्यारपवार म्हणाले, शरद पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेटवर्क आहे. आता नव्या दमाने जिल्ह्यात पक्षाची संघटन बांधणी करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवून आगामी निवडणुका जिंकू, असे प्रतिपादन गण्यारपवार यांनी केले. या मेळाव्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.