तलाठी पदभरती प्रक्रिया स्थगित करून ओबीसीला जागा आरक्षित ठेवून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी

49

– माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात 158 पदांपैकी पेसा क्षेत्रातून 151 पदे व पैसाविरहीत क्षेत्रातून 7 पदे भरण्याची जाहिरात प्रसिध्द केली आहे. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याने ओबीसी समाजातील तरुण-तरुणी रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन शासनाला मोठ्या जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल. ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सदर भरती प्रक्रिया तातडीने स्थगित करून ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित ठेवून नव्याने भरती प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी माजी ओबीसी बहुजन कल्याणमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्य शासनाकडून तलाठी पदाच्या भरतीबाबत काढण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी उमेदवारांसाठी एकही जागा राखीव ठेवली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिलेल्या 18 टक्के आरक्षणानुसार पदभरतीची नव्याने जाहिरात काढा, अन्यथा ओबीसी बेरोजगारांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा ईशाराही माजी ओबीसी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदभरतीमध्ये ओबीसींना 18 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर ओबीसी प्रवार्गावर पुन्हा अन्याय सुरू झाला असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.