भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

83

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १४ जानेवारी २०२३ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर केशवराव भांडेकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांंबाबत जिल्हाधिकारी यांंना निवेदन देण्यात आले.

विसापूर (तालुका चामोर्शी) या गावातील शेतकऱ्यांची शेतजमिन चिचडोह बॅरेजच्या पाण्याखाली गेली असून सुद्धा त्यांना त्यांच्या जागेचा आर्थिक मोबदला मागील पाच वर्षांंपासून मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ सुद्धा आली आहे. त्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी चामोर्शी यांना वारंवार भेटले असता कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिले नाही व समस्या सुद्धा सोडविली नाही. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येेथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला त्वरित देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.

चिचडोह बॅरेजमध्ये शेती गेलेल्या शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांच्यासह बापूजी नरोटे विसापूर, सुभाषभाऊ कोठारे माजी सरपंच आमगाव म.,भाऊरावभाऊ देवतळे माजी सरपंच आमगाव म., लक्ष्मण वासेकर माजी ग्राप सदस्य आमगाव व गावातील शेतकरी उपस्थित होते.