समाजाला सुखी करण्यासाठी संतांच्या विचारांची गरज : माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे

52

– लांजेडा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी समारोह

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ जानेवारी २०२३ : संतांच्या विचारातून व त्यांच्या चांगल्या कार्यातून आपणास चांगले विचार व कार्य शिकायला मिळते व आपल्या ज्ञानात भर पडते. सर्वांनी आपल्या ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा. आजच्या आधुनिक युगात शिक्षणाशिवाय पर्याय नसून पुस्तके वाचल्याशिवाय काहीच काम होऊ शकत नाही. वाचण्याचा अर्थ जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे चांगली पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर पाडावी. तसेच नवीन वर्षापासून चांगल्या गोष्टींची सुरुवात करणे आवश्यक आहे. आपले आयुष्य कसे घडवायचे हे आपल्याच हातात असते. त्यामुळे समाजाला सुखी करण्यासाठी संतांच्या विचार व कार्यांची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले.
हनुमान मंदिर, लांजेडा येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी समारोहाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिवनाथजी कुंभारे म्हणाले, ग्रामगीता माझे हृदय आहे, असे तुकडोजी महाराज सांगत असायचे या ग्रामगीतेतून आपणाला चांगले विचारांची माहिती होते व आपल्या संस्कारात भर पडते. गावांचा विकास होणे काळाची गरज असून आदर्श गाव, आदर्श व्यक्ती व आदर्श कुटुंब निर्माण होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ग्रामगीता व ध्यान याचा प्रसार व प्रचार करण्याची गरज असून प्रत्येक व्यक्तीने संतांचे विचार व त्यांचे कार्य पोहोचविण्याचे कार्य करावे, असेही यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथजी कुंभारे यांनी सांगितले.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा लांजेडाच्या वतीने हनुमान मंदिर, लांजेडा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक पंडितराव पुडके, दलित मित्र तथा आजीवन प्रचारक नानाजी वाढई महाराज, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष प्रमोदजी पिपरे, डॉ. नितीनजी कोडवते, प्रविनजी मुक्तावरम, सुखदेवजी वेठे, सुरेश मांडवगडे, गिरीधर बांगरे, पुरुषोत्तम निलेकर, श्रीराम सोनटक्के, राजेंद्र भरडकर, रमेश उरकुडे, दिवाकर पिपरे, जयश्री राकेश गावतुरे, शंकरराव मेश्राम, आयोजक शामराव नैताम, राजेश कात्रटवार, वामनराव सावसाकडे, सुनंदाताई वेठे, विद्याताई नक्षीने प्रामुख्याने उपस्थित होते.

या दोन दिवस चाललेल्या पुण्यतिथी समारोह कार्यक्रमात संतांच्या प्रतिमेचे पूजन, सामुदायिक ध्यान, विचार प्रकटन, रामधून, भजन, हळदीकुंकू कार्यक्रम, महिला मेळावा व स्नेह मिलन सोहळा अशा विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाच्या पूर्वी राष्ट्रसंताच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी लांजेडा येथील नागरिक व गुरुदेव भक्त महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशाल वैरागडे व त्यांची चमू, तसेच प्रकाश तिवारी, सदुजी भांडेकर, ईश्वर सोमनकर, जागोबा नैताम, महादेव नैताम व लांजेडा येथील सर्व गुरुदेव भक्तांनी तसेच सर्व शारदा दुर्गा मंडळाच्या सदस्य महिलांनी मोलाचे सहकार्य केले.