समाजाला जागृत करण्यासाठी मेळाव्याची गरज : प्रमोद पिपरे

55

– वैरागड येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त तेली समाज वधु-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २८ डिसेंबर २०२२ : ओबीसी समाजाचे नोकरीतील व राजकीय आरक्षण कमी करण्यात आले आहे. मात्र अजूनही ओबीसी बांधव जागा झालेला नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होऊ शकले नाही. समाजाला जागृत करण्याची आज आवश्यकता असून अशा प्रकारच्या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले. वैरागड येथे आयोजित तेली समाज वधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा नारा दिला होता. मात्र आपला समाज अजूनही संघटित झालेला नसून संघर्ष करण्यापासूनही दूरच आहे. त्यामुळे समाजाला एकत्रित, संघटित करणे आवश्यक असून अशा प्रकारचे समाज मेळावे नियमित आयोजित करून समाजाला संघटित करून त्यांना जागृत करणे व ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणे आवश्यक असल्याचे यावेळी प्रमोदजी पिपरे यांनी सांगितले.

तेली समाज वैरागडच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तेली समाज वधु-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोबरागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसींचे नेते बाबुराव कोहळे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, वडसा पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, तेली समाज महिला अध्यक्ष लताताई कोलते, प्राचार्य पी. आर. आकरे, तेली समाज वैरागडचे अध्यक्ष रमेश लांजेवार, उपाध्यक्ष सुखदेव बोडणे, सचिव संदीप ठेंगरे, सहसचिव सुरेश बावनकर, वैरागड ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्करराव बोडणे उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम श्री संताजी महाराजाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तद्नंतर संत शिरोमणी श्री संताजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वधु-वर परिचय संमेलन व तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री संताजी उत्सव समितीचे अध्यक्ष चंदू बावनकर, सचिव अमोल लांजेवार, उपाध्यक्ष अशोक लांजेवार, सहसचिव संजय ठेंगरे कवडुजी क्षीरसागर, संतोष बावनकर, तेली समाज महिला मंडळ वैरागडचे अध्यक्ष रेखाताई बोधनकर, सचिव गायत्री आकरे, सदस्य मंदाताई बोधनकर, उषा बोडणे, दीक्षा लांजेवार, निर्मला क्षिरसागर, प्रतिभा आकरे आदींनी परिश्रम घेतले.