– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची महसूलमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे मागणी
– बंगाली समाजाच्या शिष्टमंडळासह विधानसभेच्या कक्षेत दिले निवेदन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २३ डिसेंबर २०२३ : केन्द्र सरकारद्वारे गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सन १९६४ ते १९७१ पर्यंत पुनर्वसित करण्यात आलेल्या बंगाली बांधवांना त्यावेळी उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या शेतजमिनीला व निवासाच्या जागेला ५५ वर्ष झाले असून अजूनपर्यंत त्या वर्ग २ च्या जागा वर्ग १ न झाल्याने बंगाली समाजाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बंगाली बांधवांच्या वर्ग २ च्या जागा वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बंगाली बांधवांच्या शिष्टमंडळासह केली.
यावेळी शिष्टमंडळामध्ये निखिल भारत बंगाली समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रणजीत मंडल, प्रदेश सचिव विधान व्यापारी, उपाध्यक्ष विधान वैद्य,बादलजी शहा, सुभाषजी गणपती प्रामुख्याने उपस्थित होते. ५५ वर्षांपासून अजून पर्यंत त्या जमिनीचे मालकी हक्क व भूस्वामी (वर्ग १) न झाल्यामुळे त्यांना बांधकामाची परवानगी मिळत नाही. बांधकामासाठी कर्ज मिळत नाही, जमिनीचे गहाण पत्र करून शिक्षणासाठी व उद्योगधंद्यासाठी कर्ज घेता येत नाही. तसेच उद्योग धंदा उभारण्यासाठी सदर जागेचे उपयोग करताना करता येत नाही अशा अनेक अडचणी असल्यामुळे त्यांनी यासंदर्भामध्ये शासन स्तरावर पाठपुरावा करून न्याय मागण्याचे प्रयत्न केलेले आहेत. तरी त्यांच्या या मागणीला न्याय द्यावा व वर्ग २ च्या जागा वर्ग १ मध्ये रूपांतरित कराव्यात, अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली.