100 नागरीकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

78

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २३ डिसेंबर २०२३ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभाग गट कार्यालय चंद्रपूर तथा कामगार कल्याण केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. विकेश गव्हारे, डॉ. सोनम गहाणे, केंद्र महिला कल्याण सहायिका वंदना खोबरागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिरात उपस्थित नागरिक व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच बीपी, शुगर व थायरॉईडची तपासणी सुद्धा तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली व नागरिकांना मोफत औषधी व गोळ्या देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना योगिता पिपरे म्हणाल्या, आपले आरोग्य चांगले राहिले तर आपण कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व थोडे अस्वस्थ वाटल्यास लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच नियमित व्यायाम करावा व अधूनमधून बीपी, शुगर तसेच थॉयराईड ची तपासणी करत रहावी, असे आवाहन केले.

या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ 100 च्यावर नागरिकांनी घेतला. कार्यक्रमाचे संचालन केंद्र महिला कल्याण सहायिका वंदना खोबरागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता मेश्राम व कामगार कल्याण केंद्र गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.