जुन्या रुढी, परंपरा बाजूला सारून समाजाने संतांचा आदर्श रुजवावा

49

– गोंडवाना विद्यापीठाचे उप कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचे प्रतिपादन
– गडचिरोली येथे श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ९ डिसेंबर २०२२ : गेल्या अनेक वर्षापासून तेली समाज जुन्या रूढी परंपरांना घेऊन चालत आहे आजही अनेक सण उत्सव धार्मिक कार्यक्रम जुन्या परंपरेनुसार साजरे करण्यात येतात. अनेक संत महापुरुषांनी शोषित पीडित दिन दलित जनतेला जुन्या रूढी परंपरा सोडून चांगल्या विचारांचे आदान प्रदान करून समाजाच्या विकास साठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते मात्र आपला समाज स्वतंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मागासच असून जुन्या रूढी परंपरेला धरून चालत आहे आज आपल्या समाजाला आधुनिक व वैज्ञानिक युगात जुन्या परंपरा सोडून संत महापुरुषांचे चांगले विचार व त्यांचे चांगले कार्याचा आदर्श घेऊन चालण्याची खरी गरज असून सर्व समाज बांधवांनी संतांचे आदर्श ठेवून व त्यांचे विचार मनात रुजवून समाजाचा व स्वतःचा विकास साधावा हीच खरी संत महात्म्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे यांनी केले. आज दिनांक 8 डिसेंबर रोजी संताजी स्मुर्ती प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज दिनांक 8 डिसेंबर रोजी संताजी स्मृति प्रतिष्ठान आरमोरी रोड गडचिरोली येथील सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक देवानंद कामडी होते तर प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे तसेच ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, प्राध्यापक शेषराव येलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, एडवोकेट रामदास कुणघाडकर, विदर्भ प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव भांडेकर, प्राध्यापक विलासजी निंभोरकर राजेश ईटणकर व गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील तेली सेवा संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी सर्वप्रथम संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक शेषराव येलेकर, गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे ज्येष्ठ पत्रकार रोहिदासजी राऊत महाराष्ट्र तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले व जुन्या काळात होऊन गेलेल्या संतांच्या कार्याबाबत व त्यांच्या विचाराबाबत सखोल माहिती व मार्गदर्शन मान्यवरांनी समाज बांधवांना केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक विलास निंभोरकर यांनी तर आभार प्रदर्शन सुरेशजी भांडेकर यांनी केले.