जिल्हा केंद्रावर आदिवासी भवनासाठी निधी उपलब्ध करून द्या

61

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची आदिवासी विकास मंत्र्यांकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ८ डिसेंबर २०२२ : गडचिरोली जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून ओळख असून या जिल्ह्यामध्ये आदिवासींसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र या जिल्ह्याच्या केंद्रावर अजूनपर्यंत आदिवासी भवन निर्माण करण्यात आलेले नाही. त्यामूळे आतातरी जिल्हा केंद्रावर आदिवासी भवनाची निर्मिती करावी त्यासाठी उपलब्ध निधी करून द्यावा, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी अनुसूचित जमाती जात पडताळणीच्या कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्रिमहोदयाकडे केली.
यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमारजी गावित, आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे, आदिवासी विकासाचे विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. रवींद्रजी ठाकरे, प्रकल्प अधिकारी मैनक घोष, जात पडताळणी विभागाचे आयुक्त चौधरी, ट्रायबल विभागाचे बांधकामाचे अधीक्षक अभियंता ढाबेजी कार्यकारी अभियंता घुसे मॅडम, जात पडताळणी विभागाचे चव्हाण, भाजपाचे जिल्ह्याचे महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, प्रमोदजी पिपरे, नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांच्यासह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या जिल्ह्याचे यापूर्वीचे पालकमंत्री म्हणून काम केलेले असल्याने आपल्याला या जिल्ह्याचा चांगला अनुभव आहे, अभ्यास आहे. या जिल्ह्यात दुर्गम क्षेत्रातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने जिल्हा केंद्रावर कामासाठी येत असतात. मात्र त्यांना या ठिकाणी योग्य सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. करिता त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आदिवासी भवनाची निर्मिती करणे आवश्यक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागाही उपलब्ध आहे त्याकरिता फक्त आपल्या मंजुरीची आवश्यकता असून त्याकरता आपण निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मंत्रिमहोदयाकडे केली.