वॉक फॉर संविधान रॅली व संविधान दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

77

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ डिसेंबर २०२२ : संविधान (sanvidhan) फाउंडेशनच्या जिल्हा युनिट व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित वॉक (Walk) फॉर संविधान रॅली व संविधान दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रॅलीला अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
जिल्हा परिषद हायस्कूल येथून निघालेली ही रॅली (rally) संविधानाच्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून फिरली. शालेय बँडसह निघालेली विशाल मिरवणूक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या सादरीकरणाचा देखावा हे या रॅलीचे खास वैशिष्ट्य होते.
रॅलीत विविध शाळा, महाविद्यालये व वसतिगृहातील विद्यार्थी व शिक्षक, महिला व नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीची सांगता जि. प. हायस्कूलच्या सभागृहात सभेत झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री. रोहिदास राऊत होते. माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेकन, स्पर्शचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे, हसनभाई गिलानी, मराठा सेवा संघाचे दादाजी चाफले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. वडेट्टीवार म्हणाले, भारतीय राज्यघटनेने देशातील नागरिकांना कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता सशक्त नागरिक म्हणून उदयास येण्यास मदत केली असून विषमतेचे विष नाहीसे केले आहे. संविधानाने लोकांना अधिकार आणि त्यांच्या हक्कांची हमी दिली आहे. संविधानामुळेच भारत इतकी वर्षे लोकशाही देश राहिला आहे. देशाला सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी हे संविधान जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
डॉ. मानकर म्हणाले, संविधानाने समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समृद्ध केली आहेत. प्रत्येक व्यक्तीला प्रगतीची संधी दिली आहे. संविधानामुळे आपल्या देशाची प्रगती झाली आहे. सर्व नागरिकांनी या संविधानाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. रोहिदास राऊत म्हणाले की, सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याची क्षमता हीच राज्यघटनेची खरी ताकद आहे. घटनात्मक तरतुदींमुळेच वंचित आणि उपेक्षितांना स्वतःच्या पायावर उभे राहून अन्यायाविरुद्ध बंड करता आले. प्रत्येक भारतीयाला या संविधानाचा अभिमान वाटला पाहिजे आणि या राष्ट्रीय दस्तावेजाच्या निर्देशानुसार आपले जीवन जगले पाहिजे.
यावेळी मंचावर इतर पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. विलास निंभोरकर, सुरेखाताई बारसागडे, सदानंद ताराम, प्रा. गौतम दानमगे, हंसराज उंदिरवाडे, पांडुरंग घोटेकर, देवानंद फुलझेले आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
संविधान फाउंडेशनचे जिल्हा संयोजक श्री. गौतम मेश्राम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन श्री. तुलाराम राऊत यांनी तर आभार राज बनसोड यांनी मानले. कार्यक्रमाला लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.