विद्याभारती कन्या विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी तथा व्यवसाय मार्गदर्शन समुपदेशन कार्यक्रम संपन्न

116

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली/२८ नोव्हेंबर २०२२ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक विद्याभारती कन्या विद्यालय येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच व्यवसाय मार्गदर्शन समुपदेशनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. वंदनाताई मुनघाटे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे जिल्हा समुपदेशक श्री. प्रभाकर साखरे, श्री. उंदिरवाडे, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. गोपाल मुनघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री. प्रभाकर साखरे आणि श्री. उंदीरवाडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत विद्यार्थिनींनी आपल्या भावी आयुष्यात करियर निवडताना प्रामुख्याने आपली आवड, क्षमता आणि संधी या त्रिसुत्रीचा विचार करून व्यवसाय क्षेत्राची वाट निश्चित करावी, हे सांगून या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले. तसेच गोपाल मुनघाटे यांनी विद्यार्थिनींना विविध दाखले देत व्यवसाय निवडताना दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांची उंची न बघता स्वतः ची क्षमता काय आहे, हे बघूनच पुढे वाटचाल करावी असे सविस्तरपणे मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ. वंदनाताई मुनघाटे यांनी विद्यार्थिनींनी आपल्या पालकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊनच पुढील शिक्षणासाठी मार्गक्रमण करावे, असे सांगितले.
प्रस्तुत कार्यक्रमाला गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती श्री. राजू भांगरे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा बहुसंख्य विद्यार्थिनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुनंदा चिलबुले मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. हिना नंदनवार मॅडम यांनी केले.