नगर परिषद गडचिरोलीने दिलेल्या कर नोटिसाचा पुनर्विचार करा अन्यथा मोठे आंदोलन

63

– भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचा नगर परिषद प्रशासनाला इशारा

– अवाजवी जुलमी कर पद्धतीत तत्काळ दुरुस्ती करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची केली मागणी

– अन्यथा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात भाजपा रस्त्यावर उतरेल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी नगर परिषद गडचिरोलीने शहरातील नागरिकांना नवीन घर कर आकारणीचे नोटीस बजावले आहे  या नोटीसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विविध प्रकारचे कर लावून लोकांना अवाजवी कर भरण्यास सांगितले आहे. हे गडचिरोली शहर वासीयांवर प्रचंड अन्याय करणारे असून ह्या कर आकारणी नोटीसाचा पुनर्विचार करून दुरुस्ती न केल्यास भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांनी नगर परिषद गडचिरोलीच्या प्रशासनाला दिले आहे.

यावेळी निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, शहर महामंत्री केशवजी निंबोड, विनोद देवोजवार, आबाजी चिचघरे, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, भाजपा महीला मोर्चाच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, देवाजी लाटकर, युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम, विलास नैताम, दलित आघाडीचे अध्यक्ष अरुण ऊराडे, आदिवासी महिला आघाडी अध्यक्ष भावनाताई हजारे, शहर महिला आघाडी महामंत्री रश्मीताई बगमारे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुधारित कर मूल्य निर्धारणाचे विवरण करताना नगरपरिषदेने महाराष्ट्र शासनाचा शिक्षण कर, रोजगार हमी उपकर, वृक्ष कर, अग्निशमन कर, विविध शिक्षण कर, दिवाबत्ती कर, उपयोगिता शुल्क कर, असे विविध प्रकारचे जाचक व जुलमी कर शहरवासीयांवर लादलेले आहे. हे जुलमी व अन्यायकारी कर नगर परिषदेने तत्काळ रद्द करून सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरामध्ये कररचना आकारावी. हे कर भरणे इंग्रजांच्या गुलामगिरीची आठवण करून देणारे असून सध्या स्थितीमध्ये नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचे शासन नसताना प्रशासक अशा प्रकारचे निर्णय घेणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. सदर रचनेमध्ये तात्काळ दुरुस्ती करून करमुल्य सुधारणा करावी अन्यथा या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी नगर परिषद प्रशासनाला दिलेला आहे.