– आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सहकार मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे मागणी
– निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देऊन प्रशासक नियुक्त करण्याची केली मागणी
– सभासदांची नावे मतदार यादीतून वगळून मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून या निवडणुकीमध्ये अपेक्षित सभासदांची नावे मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करून प्रशासक नियुक्त करण्याची मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे सहकार मंत्री नामदार अतुलजी साळवे यांची मुंबई येथे भेट देऊन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित चामोर्शी रजी न. ६२६ ची निवडणूक प्रक्रिया सूरू झाली असून निवडणुकीपूर्वीच निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार सुरू झालेले आहेत. सभासदांना विश्वासात न घेता निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदस्यांची नावे जाणीवपूर्वक यादी मधून कापून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या संस्थेच्या मतदार यादीची तपासणी करण्याची आवश्यकता असून नव्याने पारदर्शक मतदार यादी तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राबवण्यात यावी. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये या संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मंत्री महोदयांकडे पत्र देऊन केली आहे.