युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांच्या विकासाचे कलापीठ : डॉ. मंगेश पाठक

73

– नमाद महाविद्यालयात आयोजित “इंद्रधनुष्य” जिल्हास्तरीय निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ “इंद्रधनुष्य” या सांस्कृतिक युवामहोत्सवासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघाची चाचणी पूर्वी विद्यापीठ स्तरावर व्हायची. यामुळे ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना संधी मिळत नसे. आता जिल्हास्तरावर निवड चाचणी आयोजित करण्यात आल्याने ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना सुद्धा आपण कुठेही कमी नाहीत हे दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे. कलागुणांनी युक्त व्यावहारिक शहाणपण शिकवणारे शिक्षण हे खरे शिक्षण आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास घडून येतो. त्यांना समोरच्या जगाचे द्वार खुले होते. युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांंच्या विकासाचे कलापीठ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी केले.

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ “इंद्रधनुष्य” या सांस्कृतिक युवामहोत्सवासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विध्यापीठाअंतर्गत गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आयोजित गोंदिया जिल्हास्तरीय निवड चाचणीच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंगेश पाठक बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मंगेश पाठक, जिल्हा समन्वयक डॉ. अश्विन चंदेल, एस. एस. जयस्वाल महाविद्यालयाचे डॉ. भारत राठोड, डॉ. राकेश खंडेलवाल, स्पर्धा समन्वयक खुशबू होतचंदानी, सहसमन्वयक डॉ. अंबादास बाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. पुढे बोलताना पाठक म्हणाले, व्यक्ती चांगला असो कि वाईट त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच असते. चांगल्याकडून चांगले घ्यायचे आणि वाईटाकडून काय नाही घ्यायचे, हे शिकायला मिळते. चांगल्या आणि वाईटाची ओळख विद्यार्थ्यांंना करता आली तर त्यांचे जीवन बरेच सुखकारक होते. विद्यार्थ्यांंनी युवा सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलागुणांचा विकास करावा, असे आवाहन पाठक यांनी केले.
यावेळी प्राचार्या डॉ. शारदा महाजन म्हणाल्या, कलागुण प्राप्त विधार्थ्यांचे भविष्य नेहमीच उज्वल असते. नोकरी किंवा रोजगाराची चिंता त्यांना करावी लागत नाही. आपल्या कलेच्या भरोशावर आनंदमय जीवन ते जगू शकतात. विद्यार्थ्यांंनी आपल्यातील कलागुणांची जोपासना करावी. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणे ही शिकण्याची संधी असते. महाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांंनी कलागुणांचा विकास करावा, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. यावेळी डॉ. अश्विन चंदेल, डॉ. भारत राठोड यांची समयोचित भाषणे झालीत.

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ “इंद्रधनुष्य” या सांस्कृतिक युवामहोत्सवासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत गोंदिया जिल्हास्तरीय निवड चाचणी नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात १९ व २० सप्टेंबर असे दोन दिवस घेण्यात आली. जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातील १४० विध्यार्थी १७ स्पर्धामध्ये सहभागी झाले. यात शास्त्रीय गायन (वयक्तिक) स्पर्धा, हलक्या आवाजातील गायन, पाश्चात्य एकल गायन, शास्त्रीय वाद्य (तालवाद्य), शास्त्रीय वाद्य (गैर तालवाद्य), वेस्टर्न सोलो (वाद्य) प्रश्न मंजुषा, वादविवाद, मोनो अभिनय, मिमिक्री, शास्त्रीय नृत्य ऑन स्पॉट पेंटिंग, कोलाज, कार्टूनिंग, रांगोळी आणि ऑन स्पॉट फोटोग्राफी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावरील स्पर्धकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघात निवड होण्यासाठी भंडारा, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील विजेत्या स्पर्धकांशी स्पर्धा होईल.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. परवीन कुमार, स्पर्धेचा अहवाल वाचन डॉ. अंबादास बाकरे तर आभार डॉ. योगराज बैस यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नमाद महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.