नरभक्षक वाघांना तत्काळ जेरबंद करा : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील नरभक्षक वाघांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
वाघ बाधित ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वाखाली वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सादर केले.
जिल्ह्यातील विविध भागात वाघाच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात गुरांशिवाय आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. शेतकर्‍यांना त्यांची शेती आणि जंगलावर आधारित कामे करणे कठीण झाले आहे. याचा शेती पिकांवर वाईट परिणाम होणार असून लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे नरभक्षक वाघांना तत्काळ जेरबंद करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत करावी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, शेतांभोवती सरकारी खर्चाने सौर कुंपण बसवावे, गुरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात यावे, वनक्षेत्रात गस्त वाढवावी, गावातील बेरोजगार तरुणांना वनकामांवर नियुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आली.
शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, युवक अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते विनोद अजबळे, तालुका उपाध्यक्ष हेमाजी सहारे, नारायण साखरे, ईश्वर दाणे, यशवंत चंद्रगिरे, अशोक उंदिरवाडे आदी उपस्थित होते.
वनसंरक्षक डॉ. मानकर आणि वडसा उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करून वनविभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.