राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप

243

– अपर आयुक्तांचा पुढाकार : उपयुक्त मार्गदर्शनासह कलागुणांची उधळण

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक आदिवासी दिन व आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव तसेच गुणगौरव सोहळ्याचा रविवार, 14 ऑगस्ट 2022 रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय सेमीनरी हील नागपूर येथे शानदार समारोप झाला.
सदर महोत्सव 9 ते 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथे पार पडले तर या महोत्सवाचा समारोप रविवार, 14 ऑगस्ट 2022 रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय सेमीनरी हील नागपूर येथे झाला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे होते. समारोपीय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, रा. तु. म. विद्यापीठ नागपूरचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्याम कोरेटी, सिनेट सदस्य श्री दिनेश शेराम, समाजकल्याण विभागाचे सेवानिवृत्त सहआयुक्त श्री. एम. एम. आत्राम, व्ही.एन.आय.टी. नागपूरचे प्रा. डॉ. दिलीप लटये, समाज कल्याण विभाग भंडाराचे उपआयुक्त आर. डी. आत्राम, ऑफ्रोट संस्था नागपूरचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मरसकोल्हे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरच्या सहआयुक्त तथा उपाध्यक्ष श्रीमती बबिता गिरी, ऑल इंडीया आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष श्री मधुकर उईके, आदिवासी विकास विभाग नागपुरचे प्रकल्प अधिकारी श्री अशोक वाहणे, ऑफ्रोट संस्था नागपूरचे सल्लागार तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. जी. एम. साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. श्याम कोरेटी म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीचा सकारात्मकरित्या उपयोग करुन घेतल्यास सर्वागीण विकास साधता येते. आदिवासी संस्कृतीचा इतिहास अप्रतिम आहे. मायबोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यास त्यांच्या अडचणी दूूर होतात. गोंडी, मराठी व इंग्रजी भाषेचा संवादासाठी एकत्रित उपयोग करावा. उच्च शिक्षण घेतांना भाषेचा दुधारी तलवार म्हणून वापर करा. आदिवासी विद्यार्थ्याने भाषेचा न्युनगंड बाळगु नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांंच्या आश्रमशाळा, वस्तीगृहात व इतर शैक्षणिक समस्यांंवर चर्चा करण्यात आली. अपर आयुक्त स्तरावर असलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी अपर आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे यांनी दिले व परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांंनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी केले.

नृत्यावर थिरकले मान्यवर
समारोपीय कार्यक्रमादरम्यान सुरेश वेलादे यांच्या वीर बाबुराव शेडमाके घुसाडी नृत्य – 2 पथक धानोरा, यवतमाळच्या चमुने घुसाडी नृत्य तर जंगो लिंगो ढेमसा नृत्य पथक नरखेड, जि. नागपूर या पथकाने ढेमसा नृत्य अतिशय मनमोहकरित्या सादर करुन प्रेक्षक व श्रोत्यांचे मने जिंकली. यावेळी उपस्थित मान्यवर देखील नृत्यावर थिरकले. परदेशी उच्च शिक्षणासाठी इग्लंड येथील विद्यापीठात निवड झालेली सुक्रीती उईके हिने इंग्रजीमध्ये गीत गायिले.
सांस्कृतिक कलागुणाची उधळण
या राज्यस्तरीय महोत्सवात अनेक विषयांंवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी सांस्कृतिक कलागुणांना उजाळा देऊन आदिवासी युवक – युवतीने सुप्तगुणांचा परिचय दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात तीस (30) नृत्य पथकाने सहभाग घेतला. यामध्ये आदिवासी पांरपारिक कांबड नृत्य पथक उडदावणे, जि. अहमदनगर यांच्या कांबड नुत्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक वीर बाबुराव शेडमाके घुसाडी नृत्य – 2 पथक धानोरा, जि. यवतमाळ या पथकाच्या आदिवासी नृत्याने प्राप्त केले. एकलव्य आदिवासी सांस्कृतिक कलापथक डोल्हारे, जि. नाशिक या पथकांच्या आदिवासी नृत्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. आदिवासी कन्सरी माता ढोलनृत्य पथक साखरशेत, जि. पालघर या पथकांच्या ढोलनृत्याने यावेळी उत्तेजनार्थ बक्षिस पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक विजेत्यांना गौरविण्यात आले. या महोत्सवात आदिवासी हस्तकलांचे 48 स्टॉल प्रदर्शनी व विक्रीसाठी लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपआयुक्त दशरथ कुळमेथे यांनी केले. संचालन कवडस शासकीय आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका शिल्पा खुळे व धनश्री परतेती यांनी केले. आभार आदिवासी विभाग नागपूरचे सहाय्यक आयुक्त (प्रशासन) नयन कांबळे यांनी मानले.
समारोपीय कार्यक्रमात श्रोत्यांंमध्ये साहित्यिक तथा आदिवासी सेवक प्रा. डॉ. वामन शेडमाके, डॉ. पुरुषोत्तम मडावी, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक शिवराम भलावी, सामाजिक कार्यकर्ते भाऊ कुलसंगे, मनिष वासे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे सहाय्यक आयुक्त (वित्त) विलास कावळे आदींसह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
ऐनवेळेवर या राज्यस्तरीय महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी नागपूर आदिवासी विकास विभागाकडे आली. अत्यंत अल्प कालावधीत हा सोहळा नागपूरचे अपर आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वी करुन दाखविला. अनेक मान्यवरांनी याबाबत नागपूर आदिवासी विकास विभागाची प्रशंसा केली.