गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार !

113

– किरण पांडव यांची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्यता मिळाली असून आता हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार असल्याची माहिती किरण पांडव यांनी दिली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ना. एकनाथ शिंदे विराजमान झाले असून किरण पांडव यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबतही चर्चा करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सुविधा व बेड संख्या पूर्णपणे करण्यासाठी ना. शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, शासकीय महिला व बाल रुग्णालयात १०० बेडच्या वाढीव बांधकामाला मंजुरी दिली असून त्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आवश्यक असणारी बेड संख्या पूर्ण होत असल्याने राज्य शासनाकडे तयार असलेला प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. अमित देशमुख यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या पुढील काळात सदर प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करून आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या परवानगीनंतर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठविला जातो. या प्रस्तावाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांची सुद्धा परवानगी आवश्यक असते. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार असून गडचिरोली येथे ना. एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्य शासनाकडून निश्चित घोषित केले जाणार आहे. पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात ना. शिंदे यांचे गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न होते. आता ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार असल्याची माहिती किरण पांडव यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर दिली आहे.
जिल्हा विकासाला गती मिळणार
ना. एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उत्तम कार्य केले आहे. जिल्ह्यातील आदिवासी समाज, शेतकरी, कष्टकरी नागरिकांसाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. कोरोना काळातही पालकमंत्र्यांनी गडचिरोलीला मुबलक निधी उपलब्ध करून दिला. आता ना. शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.
प्रलंबित प्रकल्प मार्गी लागणार
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक समस्या निधीअभावी सुटलेल्या नाहीत. गडचिरोली येथील नगरउद्यान, रेल्वे मार्ग, तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी आता निधीच चणचण भासणार नाही. त्यामुळ प्रलंबित प्रकल्प लवकरच निकाली लागणार, अशी माहितीही किरण पांडव यांनी दिली आहे.