गडचिरोली पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांगांंसाठी कृत्रिम अवयव वाटपासाठी तपासणी शिबिर

115

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजू आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व स्तरातील दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व अलिम्को कंपनी मुंबई, जनरल इन्श्युरंस कंपनी मुंबई यांच्या सहकार्याने ५ मे २०२२ रोजी एकलव्य हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पार पडला. सदर दिव्यांग तपासणी शिबिरात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ३१६ दिव्यांगांंनी आपली तपासणी करून घेतली. त्यापैकी २६० दिव्यांग नागरिक हे कृत्रिम अवयव उपकरणासाठी पात्र ठरलेले आहेत. ज्या दिव्यांगांंना कृत्रिम अवयव उपकरणाची आवश्यकता आहे, अशा दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोफत कृत्रिम अवयव उपकरणाचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यावेळी दिव्यांग नागरिकांना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत.

आपल्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करु. आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून दिव्यांगासाठी आरोग्य शिबिर राबवुन ९८० दिव्यांगांंना युडीआयडी कार्ड, ६५० दिव्यांगांंना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, २७६ दिव्यांगांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. तसेच रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी २९६, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट ३८, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकूण २४७३ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १००, शेळीपालन ६७, शिवणकला १०५, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड ४५०, पोलीस प्रशिक्षण ७८०,
टु व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण ३७० असे एकुण २७३७ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली पार पडला असून कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अहेरी), अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, कमलेश यादव सी.एस.आर. कन्सलटंट, अलिम्को मुंबई, डॉ. सतिश गोगुलवार संस्थापक, संयोजक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी भावेश कावरे व त्यांचे सर्व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोलीस उपविभाग, पोस्टे, उपपोस्टे, पोमकेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार परिश्रम घेतले.