– गडचिरोलीच्या घनदाट जंगलात पोहोचले खासगी डॉक्टर्स
– आरोग्य तपासणीत अनेकांच्या शरिरात आढळले रक्ताचे प्रमाण कमी
– एक अनोखा महाराष्ट्र दिन, जिथं सेवाकार्य ठरले महत्वपूर्ण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिथं खायला अन्न मिळणं कठीण जातं, तिथं आरोग्य सुविधा तर अत्यंत अत्यल्पचं. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही व्यथा गडचिरोली शहरातील खासगी डॉक्टरांच्या लक्षात आली. सामाजिक बांधिलकी जोपासत या मंडळींनी एक विडा उचलला आणि गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा गावात आरोग्य सेवा पोहोचली. एवढच नव्हे तर, त्या लोकांना मायेने दोन घास भरवून आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, हा संदेश देण्यात आला.
हे सामाजिक कार्य करणारे गडचिरोली येथील खासगी डॉक्टर आणि त्यांच्या चमुचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सन 2012 चा तो काळ होता. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे तसे दुर्गम पण तेवढंच निसर्गरम्य असे स्थळ. पण या ठिकाणी अत्यंत गरिबी आणि मागासलेपण आहे. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना वैद्यकीय सुविधा मिळणेही मोठे कठीण होते. ही बाब गडचिरोली येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिवनाथ कुंभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्षात घेतली. समाजाप्रती आपली एक बांधिलकी आहे आणि हा खडतर प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे, हा विडा उचलून डॉ. अनंत कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी फळी या कामात गुंतली.
महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेल्या, अतिदुर्गम आणि मागास अशा बिनागुंडा गावात सन 2012 पासून आरोग्य मेळावा घेण्यास सुरुवात झाली. संपूर्ण आरोग्य व वैद्यकीय तपासणी, औषध उपलब्ध करून देणे, रक्तघटक तपासणी, वस्त्रदान, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू वितरण, मच्छरदाणी वाटप, अन्नदान अशा अनेक उपक्रमांचा आधार घेत हे व्रत सुरू झाले. सन 2012 पासून सुरू झालेला हा उपक्रम 2019 पर्यंत अविरत सुरू होता. मात्र जागतिक महामारी म्हणून कोरोनाने कहर केला आणि सलग दोन वर्षे त्यात खंड पडला. याबाबत उदासीन झालेल्या या मंडळींनी यावर्षी मात्र महाराष्ट्र दिनी आपला संकल्प पूर्ण केला.
1 मे 2022 महाराष्ट्र दिन. सर्वत्र राज्याचा जयजयकार. उत्साह आणि धामधूम. पण याच दिवशी डॉ. अनंत कुंभारे (क्ष- किरण तज्ञ), डॉ. यशवंत दुर्गे (सर्जन, कॅन्सर तज्ञ), डॉ. निकेश खोब्रागडे (सर्जन), डॉ. मुकेश अत्यालगडे (बालरोगतज्ञ), डॉ. नीळकंठ मसराम (क्ष- किरण तज्ञ), डॉ. साई खरे (दंत चिकित्सक), श्री. श्याम सरदार (क्ष- किरण तंत्रज्ञ), श्री. कलकोट्वर ( नेत्र तंत्रज्ञ), श्री. प्रमोद पळशीकर ( प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्री. अनिल तिडके (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्री. हरीश दांडेकर ( औषध निर्माते), श्री. दिलीप बिस्वास (औषध निर्माते), श्री. होमदेव कोषमशिले, श्रीकांत कोसरे, मुकेश ढवळे (प्रधानमंत्री जन आरोग्य मित्रा), निखिल बुरांडे, दिवाकर सातेलवर, चेतन काळबांधे, अक्षय धकाते, मनीष गुद्देवार, आकाश चांदेकर, (व्यवस्थापन मंडळ) ही टीम अतिदुर्गम बिनागुंडा गावात पोहोचली.
धन्वंतरी हॉस्पिटल आणि गडचिरोलीच्या प्रख्यात डॉक्टर्स समुहाने या दिवशी आदिवासी बांधवांची सेवा करून खऱ्याअर्थाने महाराष्ट्र दिन साजरा केला. या ठिकाणी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करून शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आवश्यक त्यांना मोफत औषध उपलब्ध करून दिले. रक्तघटक तपासणीसह अन्य वैद्यकीय तपासण्या केल्या. यासोबतच वस्त्रदान, जीवनावश्यक वस्तुुंच्या वाटपासह विविध सामाजिक उपक्रम राबवून अन्नदान केले. स्वतः त्यांच्यासोबत सहभोजन घेत आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संदेश दिला. विशेष म्हणजे या मेळाव्यात झालेल्या आरोग्य तपासणीत अनेकांना रक्ताचे प्रमाण कमी आढळले, तर 5 रुग्ण हे मलेरियाने बाधित आढळून आले. त्यांना सुयोग्य उपचार देत यापुढे हा व्रत अधिक भक्कम करण्याचा निर्धार या मंडळींनी यावेळी केला आहे. या उपक्रमाने बिनागुंडा येथील नागरिक भारावून गेले होते.
यांचे मिळाले मार्गदर्शन आणि सहकार्य
महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याचा सीमावर्ती भाग म्हणजे भामरागड तालुका. त्यातही बिनागुंडा म्हणजे अतिशय घनदाट जंगलात वसलेले गाव. त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासत वैद्यकीय आणि इतर सुविधा पुरविण्याचा मनोदय गडचिरोली येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी व्यक्त केला. त्याला डॉ. अनंत कुंभारे यांनी वसा मानला आणि आपल्या सहकारी प्रख्यात डॉक्टर मंडळींंना घेऊन हा संकल्प पूर्ण केल्या. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते महेश काबरा यांनी जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी आवश्यक तेवढा औषधसाठा उपलब्ध करून दिला. बिनागुंडा, फोदेवाडा, तुुर्रेमर्का, कुवाकोडी, गुंडेनुर या गावातून जवळपास ३५०-४०० लोकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला.