खनिज संपत्तीवर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यातच उभारा : खा. अशोक नेते यांची 377 अधीन सूचनेअंतर्गत लोकसभेत मागणी

81

– सुरजागड लोह प्रकल्प चामोर्शी किंवा एटापल्ली येथे उभारण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणावर लोह खनिज असून त्याचे उत्खनन गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. उत्खनन केलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी सदर कच्चा माल बाहेर पाठविल्या जात आहे. त्यामुळे सुरजागड परिसरातील गावांमधील लोकांमध्ये शासनाप्रति प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आदिवासी, दुर्गम भागातील जनतेची मागणी लक्षात घेता सुरजागड येथील कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली किंवा चामोर्शी तालुक्यात उभारून येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी 377 अधीन सुचनेनुसार लोकसभेत केली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा महाराष्ट्रातील अतिमागास , आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व अविकसित क्षेत्र आहे. या क्षेत्रात मैगनिज, लोहा, अभ्रक, हिरा इत्यादी खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जिल्ह्यात उद्योगधंदे व कारखाने नसल्याने येथील बेरोजगार युवक वणवण भटकत आहे. जिल्ह्यात उपलब्ध खनिज संपत्ती व वनोऔषधी वर आधारीत प्रकल्प, उद्योग निर्माण केल्यास क्षेत्रातील हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल व ते आर्थिक सक्षम होतील. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहाचे उत्खनन करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व स्टील प्लान्ट गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी किंवा एटापल्ली तालुक्यात उभारण्यासाठी केंद्रशासनाने उचित निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी 377 अधीन सुचने नुसार लोकसभेत केली व जिल्ह्यातील या उद्योगाच्या महत्वाच्या प्रश्नांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.