Home गडचिरोली विभागीय स्पर्धेसाठी प्रकल्पाचे खेळाडू चंद्रपूरला रवाना

विभागीय स्पर्धेसाठी प्रकल्पाचे खेळाडू चंद्रपूरला रवाना

89

– गडचिरोलीसह ९ प्रकल्पांचा समावेश ; शिबिरात ३३६ खेळाडूंचा कसून सराव

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर आता १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथील मैदानावर होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी शुक्रवार,१२ डिसेंबर रोजी गडचिरोली प्रकल्पाचे ३३६ खेळाडू रवाना झाले. यामध्ये १७१ मुले व १६५ मुलींचा समावेश आहे. विभागीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी या खेळाडूंनी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर कसून सराव केला. यासाठी ६ ते ११ डिसेंबर पर्यंत सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर येथे आदिवासी विकास विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, नागपूर, वर्धा, भंडारा व देवरी अशा ९ प्रकल्पातील सुमारे २ हजार ९०० खेळाडू सहभाग घेणार आहेत.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकार डॉ. प्रभु सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर यांनी सराव शिबिराचे नियोजन केले होते. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची तयारी करून घेण्यात आली.

सराव शिबिरात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील ३३६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक तर लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळांचा कसून सराव करून घेण्यात आला.

error: Content is protected !!