– काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा कृषीप्रधान व कृषीसंपन्न जिल्हा असून येथील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. विशेषतः धान उत्पादनाचे प्रमाण जिल्ह्यात मोठे असून सध्या कापणी व बांधणीची प्रक्रिया पूर्णत्वास पोहोचली आहे. परिणामी शेतकरी आपले उत्पादन शासकीय धान खरेदी केंद्रांवर विक्री करण्यास उत्सुक आहेत.
मात्र, जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शासकीय धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धान खरेदी सुरू न झाल्यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान खरेदीची प्रक्रिया पुढील आठ दिवसांत तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
जर आठ दिवसांत धान खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत, तर शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, असा तीव्र इशारा ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.







