– संघटनेच्या वतीने निवेदन सादर : प्रकल्प अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : संविधान दिनाचे औचित्य साधून बुधवार, २६ नोव्हेंबरला सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने एकस्तर पदोन्नती अंतर्गत माध्यमिक शिक्षकांना न्यायालयाच्या व २९ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक मुख्याध्यापकांची मूळ वेतन श्रेणी ग्रेड पे ४८०० लागु करण्याच्या संबंधाने व इतर मागण्यांचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांना सादर करण्यात आले. यावेळी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडवण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे नागपूर विभागीय सचिव विकास जनबंधू, प्रकल्प पदाधिकारी पुरुषोत्तम डोंगरवार, रमेश कोरचा यांच्या नेतृत्वात अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्यांबाबत प्रकल्प अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
अनुदानित आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षकांना ४८०० ग्रेट पे बाबत अपर आयुक्त यांच्याशी चर्चा करून लवकरच उचित निर्णय घेऊ तसेच वरिष्ठ स्तरावरच्या समस्यांबाबत पुढील कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले. अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पाच तारखेपर्यंत करण्यासाठी कार्यालय सकारात्मक असून वेतन देयके विहित मुदतीत सादर करावे, अशी सूचना सुद्धा यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी दिली.
शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करताना माध्यमिक शिक्षक सुधीर भोयर, निलकंठ उईके, किरण बरडे, सुनिता मस्के, मोरेश्वर वलके, सचिन खोब्रागडे, एम. टी. दरवडे, व्ही. डी. दूधबळे, के. एम. टिकले, ए. जे. नरोटे, एम. एम. कुंभारे, डी. एन. जाभुळकर आदी कर्मचारी उपस्थित होते.







