Home गडचिरोली नवागतांच्या पहिल्या पावलांचे उमटले ठसे

नवागतांच्या पहिल्या पावलांचे उमटले ठसे

87

– मिचगाव बूज. येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

– गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंचायत समिती धानोरा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिचगाव बूज. येथे सोमवार, २३ जून रोजी नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात नवागतांचे स्वागत, शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे व पाठ्यपुस्तकांच्या वितरणाने झाली. स्वागताने विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले.

प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर कोवे होते. नवागतांचे शाळेतील पहिले पाऊल शाळेसाठी किती आनंददायी व उत्साहवर्धक ठरले याबाबत आपल्या भावना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनातून व्यक्त केल्या.नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षकांचा हात धरून वर्गखोल्यात प्रवेश केला तेंव्हा शाळेतील त्यांचे पहिले पाऊल कुंकवाच्या ठशांनी उमटवून जतन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, बूट, सॉक्स व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शालेय परिसर व वर्ग खोल्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते.

प्रवेशोत्सव निमित्ताने शाळेत शालेय विद्यार्थी बचत बँक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच माझे वाचनालय माझी अभ्यासिका या दालनाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा निरुता पुन्घाटे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी शा.व्य.स.सदस्या पायल करंगामी, मुख्याध्यापक योगेश वाढई, सुधाकर तुलावी, संदीप कुसनाके, सिंधूताई मडावी, मातापालक राधाताई आतला, जास्वंदा पदा, निरंजना उसेंडी, आशा राऊत, पोलिस पाटील पुनाजी राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक विनायक पदा, गुरुदेव राऊत, सचिन पोहनकर,माजी विद्यार्थीनी नंदिनी उसेंडी, साहिल राऊत, श्रुती नेवारे, पालक, कर्मचारी, विद्यार्थी आदींचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!