– वीस दिवस नीट व जेईईबाबत मार्गदर्शन : २५० आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी व लिफ्ट फार अपलिफ्टमेंट पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खमनचेरु येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत लिफ्ट फाॅर अपलिफ्टमेंट निवासी कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. वीस दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील दहावीची परीक्षा दिलेल्या २५० आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
प्रकल्प कार्यालय अहेरी येथील शिक्षण विस्तार अधिकारी डी. के. कस्तुरे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक राजेश दुर्गे होते. प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम. के. बल्की, डी. डी. भोंगळे, तज्ञ मार्गदर्शक डॉ. सुबोध कळमणुरीकर, डॉ. ओमराज पॉल, डॉ. शिवम काळेकर, डॉ. श्रवण वेलादी, डॉ. ओमकार बिलवले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनपर भाषणात डी. के. कस्तुरे म्हणाले, समाजातील वंचित, उपेक्षित तसेच आर्थिक व सामाजिक मागासलेल्या वर्गातील विद्यार्थी नीट, जेईई सारखे महागडे कोचिंग क्लासेस लावू शकत नाही. या विद्यार्थ्यांना अगदी मोफत, नि:शुल्क फाउंडेशन कोर्स व बेसिक नाॅलेज देण्याकरिता लिफ्ट फाॅर अपलिफ्टमेंट या संस्थेच्या माध्यमातून दहावी झालेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे व डॉक्टर झाल्यावर दुर्गम भागात आपली सेवा द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने डॉ. ओम दिवटे म्हणाले, २०१५ ते २०२१ या कालावधीत अनेक विद्यार्थी एम. बी. बी. एस., बी. ए. एम. एस., बी. डी. एस. मध्ये प्रवेशित झाले. २०३५ पर्यंत आणखी तळागाळातील १०० विद्यार्थी एम. बी. बी एस. झाले पाहिजे, असा संस्थेचा मानस आहे.
कार्यशाळेनंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल.
कार्यक्रमाचे संचालन जी. आर. बोकडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वेगवेगळ्या आश्रम शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.