– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी जवळील प्राणहिता पोलिस उपमुख्यालय ते अहेरी मुख्य चौक या रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन होऊन १० महिन्याचा कालावधी लोटला. मात्र काम सुरू झाला नाही. संबंधित
कंत्राटदाराने रस्ता कामासाठी टाकलेली गिट्टी परत उचलली व अद्याप एक साधा खड्डा सुध्दा बुजविलेला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा अहेरी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
मागील दहा महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या नुतणीकरण व डांबरीकरणाचे उद्घाटन होऊनही अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नाही. अहेरी ते प्राणहिता पोलिस उपमुख्यायापर्यंत अनेक खड्डे पडलेले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला ताकीद दिली नाही. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याला संबंधित कंत्राटदार जबाबदार आहे. याकडे आतातरी लक्ष देऊन सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा अहेरी येथे आपण उपोषणाला बसणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.