शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदारांचा भ्रमनिरास करणाऱ्या सरकारला धडा शिकवा

35

– विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

– गांगलवाडी येथे महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार महंगाई पे वार, म्हणून मोदी सरकारने खोटे बोलून सत्तेवर येताच देशातील मोजक्या उद्योगपतींचे हित जोपासत प्रचंड महागाई वाढविली. तर राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य खोके सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. अशा सरकारला आता धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील गांगलवाडी येथे आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहिण योजना आणली पण आता याच योजनेवरून हे भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहे. भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत 1500 रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा असे सांगितले. इतकेच नाहीतर त्यांची व्यवस्था करतो अशी धमकी दिली. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? लाडक्या बहिणींना भाजपकडून धोका आहे, असे चित्र आहे. म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा,  अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

आयोजित कार्यक्रमास विमुक्त जाती भटक्या जमाती प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेणके, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सभापति डॉ. राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, कम्युनिस्ट पक्ष नेते विनोद झोडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास विखार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, कल्पना गेडाम, मंदा चौके, किशोर राऊत,प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतीचे कर्जमाफ करते पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावले आहे. मोदी सरकार आले तेव्हा तर पंधरा लाख देऊ असे आश्वासन दिले आता १५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ५ हजार कोटीचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून झगडावे लागले पण यामुळे संपूर्ण क्षेत्रातील 80% शेती ओलिताखाली आली आहे. तसेच मतदारसंघातील रस्ते, घरकुल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोगा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. ब्रह्मपुरीमध्ये मी लोकप्रतिनिधी नाही तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी मार्गदर्शनपर युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, भाजपकडे टीका करण्यासारखे काहीच नसल्याने खोटे बोलून रडीचा डाव सुरू आहे. राज्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली असून मोठया प्रमाणात गुन्हेगारी फोपावली आहे. लाडकी बहीण सांगून भ्रष्ट महायुतीच्या भूल थापाना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर मंचावरील ब्रम्हपुरी काँग्रेसचे खेमराज तिडके, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर व मंदा चौके यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तथा ब्रम्हपुरी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकास कामांची माहिती आपल्या मनोगतातून उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल मैंद, प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर यांनी केले. आयोजित मेळाव्यास गांगलवाडी परिसरातील बहुसंख्येने महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.