परतीच्या पावसाने शेतपिकाचे प्रचंड नुकसान

22

– तत्काळ पंचनामे करण्याचे आमदार कृष्णा गजबेंचे तहसीलदारांना निर्देश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चारही तालुक्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता नुकसानग्रस्त शेतपिकाचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी चारही तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहेत.

आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या धानोरा,आरमोरी,कुरखेडा तसेच कोरची तालुक्यात १९ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या परतीच्या पावसाने उभ्या धान पिकाचे तसेच कापलेल्या धान पिकावर पाणी जाऊन पिक पाण्याखाली आल्याने सडून प्रचंड नुकसान झाले आहे.

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील उपरोक्त चारही तालुक्यातील शेतकऱ्यांची उपजिवीका धान पिकावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची एकुणच आर्थिक स्थिती बेताचीच असून अनेकांनी कर्ज घेऊन, हात उसणवारे करून शेती केली आहे. धान पिक ऐन भरात असताना व मळणीसाठी धान पिकाची कापणी करण्यात आली असताना कडपा पाण्याखाली येऊन धान सडल्याने प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासकीय स्तरावरुन शेत पिकाचे एक रुपयात पीकविमा काढण्यात आल्याने प्रमाणापेक्षा अधिक नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देय आहे.ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असल्याने नुकसानग्रस्त शेत पिकाचे तत्काळ मोका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार गजबे यांनी संबंधित चारही तहसीलदारांना दिले आहेत.