शहरातील समस्या तत्काळ सोडवा : ऋतुजा कन्नाके

38

– नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेवर जवळपास गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय काळ सुरू असून, गडचिरोली शहर अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. शहरातील सर्वात मोठी समस्या ही नालीसफाईची असून शहराच्या अनेक भागात नाल्यांचा उपसा हा अनियमित रित्या होत आहे. ज्यामुळे शहरात सर्वत्र दुर्गंधी व गंदगी पसरत असून, डासांचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा चिटणीस ऋतुजा कन्नाके यांच्या नेतृत्वात आज नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात संपूर्ण शहरातील तात्काळ नाल्यांचा उपसा व्यवस्थितरित्या करण्यात यावे, शहराच्या अनेक रस्त्यावरील विद्युत बल्ब व वस्त्यातील विद्युत खांबावरील बल्ब बंद असून लोकांना अंधारात ये – जा करावे लागते, गडचिरोली शहरात चार राष्ट्रीय मार्ग असून शहरातील मुख्य रोड पोटेगाव रोड ते चामोर्शी रोड, आयटीआय बायपास ते गोकुळ नगर, रेड्डी गोडाऊन ते धानोरा रोड, धानोरा रोड ते पोटेगाव रोड या शहरातील मुख्य मार्गावर रात्रीच्या वेळी मोकाट गुरांचा वावर असतो. ज्याच्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना रात्रीच्या वेळी रहदारीकरिता फार मोठा त्रास होतो. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने मोकाट गुरांची व्यवस्था तत्काळ मार्गी लावावी याही बाबी निवेदनात नमूद करून मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, महिला शहराध्यक्ष प्रीती कोवे, ओबीसी सेल शहराध्यक्ष सुनीता सेलोकर, शहर सरचिटणीस मीना माळवणकर, खुशबू रामटेके, रीना गेडाम, मंजुषा लांबट, पोर्णिमा गडसुलवार, अश्विनी भसारकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.