बुधवारपासून पोटेगावात बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा

34

– आदिवासी विकास प्रकल्प : पाच बिटात अडीच हजारावर खेळाडू दखविणार क्रीडा नैपुण्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा, भाडभिडी ,सोडे, अंगारा व कोरची या पाच बिटात बुधवार, १८ सप्टेंबरपासून तीन दिवसीय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. या सर्व पाचही बिटस्तरीय क्रीडा संमेलनात गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय व १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रम शाळेतील सुमारे २ हजार ५०० आदिवासी खेळाडूंचा सहभाग राहणार असून क्रीडा नैपुण्यतेचे उत्तम प्रदर्शन करणार आहेत. कारवाफा बिटातील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या मैदानावर सकाळी ९ वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते होणार आहे.

अध्यक्षस्थानी पोटेगाव ग्राम पंचायत सरपंच अर्चना सुरपाम राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले, अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा कुमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू पोटावी, गव्हाळहेटीच्या सरपंच कांता हलामी, नरेंद्र मोहूर्ले, शिवाजी नरोटे, किशोर मुनरातीवार, विनोद मडावी, ज्योती आलाम, केंद्रप्रमुख एस. एम. निंबोरकर, मुख्याध्यापक टी. जे. पदा, प्रशांत देव्हारे, विष्णू चव्हाण, वंदना महल्ले, यशोधरा उसेंडी, अनिल पवार, सुनील नन्नेवार, अजय बलगुजर, वसंत बावणे, मंगेश ब्राह्मणकर, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कारवाफा बिट स्पर्धेत गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा आठ आश्रमशाळांचा समावेश आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.

भाडभिडी बिटाच्या स्पर्धा रेगडी येथे सोडे बिटाच्या स्पर्धा मुरूमगाव येथे, अंगारा बिटाच्या स्पर्धा येंगलखेडा येथे तर कोरची बीटाच्या स्पर्धा कोटगुल येथील शासकीय आश्रमशाळेच्या मैदानावर आयोजित केल्या आहेत. क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत, असे प्रसिद्ध प्रमुख सुधीर शेंडे यांनी कळविले आहे.