खाणसमर्थक आत्रामांच्या विरोधात ग्रामसभांचा उमेदवार उभा करणार : भाई रामदास जराते

19

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरीचे आजी – माजी आमदार आणि नव्याने इच्छुक सर्व आत्राम हे बेकायदेशीर आणि बळजबरीने खोदण्यात येणाऱ्या लोह खाणींचे समर्थक आहेत. मंजूर आणि प्रास्तावित खाणींमुळे संपूर्ण दक्षिण गडचिरोली उध्वस्त होणार असताना या विरोधात कोणीही बोलायला तयार नाहीत. उलट खाणींचे समर्थन करुन कोट्यवधी कमावण्यासाठी बाप – मुलगी – पुतण्यामध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. कोणताही आत्राम निवडूण आला तरी या क्षेत्राचा उध्दार होणार नसल्याने पिढ्यानपिठ्या पासूनचे नैसर्गिक संसाधने वाचविण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रात खाणविरोधी आंदोलनाच्या वतीने ग्रामसभांचा उमेदवार उभा करण्यात येणार असल्याचे खदानविरोधी कार्यकर्ते तथा शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी जाहीर केले.

आलापल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाई रामदास जराते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामसभा आपले नैसर्गिक संसाधने, संस्कृती आणि अस्तीत्व वाचविण्यासाठी विनाशकारी लोह खाणींना विरोध करीत आहेत. मात्र खाणींतून मिळणाऱ्या मलाईपोटी स्थानिकांचा आवाज दडपून टाकण्यात येत आहे. आपल्याला काॅंग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडी न्याय देईल या भावनेने खदान विरोधी ग्रामसभांनी यापूर्वी मतदान केले. मात्र जनतेचा भ्रमनिरास झाला.आता येणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अहेरीतील आत्राम परिवारात केवळ नवीन येणाऱ्या खाणींतून मलाई लाटण्यासाठीच्या हव्यासातून बंड होत आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीतील पक्षाने आत्राम परिवारातील खदान समर्थक व्यक्तीला संभाव्य उमेदवारी देणे हे अनेक वर्षांपासूनचा खदान विरोधी संघर्ष दडपून टाकण्यासारखे आहे, अशी टीका भाई रामदास जराते यांनी केली आहे.

येणाऱ्या निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या तीनही आत्रामांविरोधात खदान विरोधी कार्यकर्त्याला उमेदवार म्हणून उभा करण्यात येणार आहे. तसेच उमेदवार कोण असेल याबाबत भाजप, काॅग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना वगळता खदानविरोधी राजकीय पक्ष, संगटना, पारंपरीक ईलाके, ग्रामसभांच्या कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही यावेळी भाई रामदास जराते यांनी दिली.

पत्रकार परिषदेला सुरजागड पारंपारिक ईलाका गोटूल समितीचे प्रमुख व माजी जि. प. सदस्य सैनू गोटा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. सचिन मोतकुरवार, स्टुडन्ट फेडरेशन चे जिल्हा संयोजक काॅ. सुरज जक्कुलवार, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, ग्रामसभेचे कार्यकर्ते मंगेश नरोटे, सुशिला नरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.