उद्या गडचिरोली बंदचे आवाहन

28

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती गडचिरोलीच्या वतीने उद्या, बुधवार २१ ऑगष्ट २०२४ रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. गडचिरोली शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा) च्या स्थानिक रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकारी यांनी दिली आहे.

अनु. जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलेअर बाबतीत मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तत्काळ रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदिय कायदा पारित करावा, आरक्षणाचे अबकड गट पाडण्यात येवू नये, कारण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने विविध जातीतील लोकांना एकत्र आणून गुलामी नष्ट केली परंतु या निर्णयाने फूट पाडून पुन्हा गुलामित टाकण्याचा प्रयत्न होत आहे, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

सदर होवू घातलेल्या गडचिरोली बंदमध्ये सर्व अनु. जाती जमातीच्या लोकांनी संघटना व विविध गटातटातील लोकांनी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला प्रा. मुनिश्वर बोरकर, प्रा. भाष्कर मेश्राम, ऍड. राम मेश्राम, कुणाल कोवे, मिलिंद बाबोंळे, मंदिप गोरडवार, नरेश महाडोरे, सुरेश कन्नमवार, तुळशीराम सहारे, उमेश उईके, विद्या कांबळे, रेखा कुंभारे, अरविंद वाळके, मालती पुडो, वनिता पदा यांच्यासह अनेक एससी-एसटी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.