– अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे शिक्षकांना आवाहन
– जिल्ह्याच्या दौऱ्यात शाळांना भेटी व संवाद
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांना भेटी देऊन आश्रमशाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची बारकाईने पाहणी केली. आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी असलेल्या उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी केली. यावेळी मार्गदर्शन करताना आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे शिक्षकांनी मनापासून लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. अपर आयुक्त रवींद्र ठाकरे १५ जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात पाच दिवसाच्या दौऱ्यावर आहेत.
आश्रमशाळा भेटीसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे गडचिरोली, आरमोरी, धानोरा, चामोर्शी या चार तालुक्यातील व कुरखेडा येथे शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहामध्ये कुरखेडा, कोरची, वडसा या तीन तालुक्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या महिला बचतगटांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तसेच आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत सुद्धा अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रकल्प कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना उपस्थित होते.
पहिल्या तीन दिवस गडचिरोली प्रकल्पातील रेगडी, भाडभिडी, मार्कंडादेव, कुरंडीमाल, सोनसरी, गोडलवाही, पेंढरी या सात शासकीय आश्रमशाळांना भेटी दिल्या. गोडलवाही आश्रमशाळेमध्ये कारवाफा, पोटेगाव, सोडे, रांगी, अंगारा या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना बोलावून मार्गदर्शन केले. शाळेतील भेटीत मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांची संवाद साधला.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, ब्राईटर माईंड, भविष्यवेधी शिक्षण, संवाद कौशल्य, नीट व जेईई तसेच इतर स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन, उद्बोधन वर्ग, प्रेरणादायी मार्गदर्शन, इंग्रजीतून संभाषण आदी उपक्रमांची प्रत्यक्ष तपासणी केली. या उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजी मधून संवाद करावे, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. आपल्या नेमून दिलेल्या जबाबदारीत कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी यावेळी दिली. शाळा व वसतीगृहाच्या सोयी सुविधांची पाहणी करून समस्या देखील जाणून घेतल्या.
अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीकडे विशेष लक्ष आहे. १९ जुलैपर्यंत अपर आयुक्त रवींद्र ठाकरे जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड प्रकल्पातील आश्रमशाळांना भेट देण्यासाठी दौऱ्यावर आहेत. गडचिरोली प्रकल्पातील भेटीत त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक कुश राठोड, शिक्षण सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, प्रशासन सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले उपस्थित होते.