विधानसभा निवडणुकीत स्थानिकांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार अभिजित वंजारी

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोली, आरमोरी व अहेरी विधानसभा क्षेत्रात स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी याकरिता आपला प्रयत्न राहील. गडचिरोली जिल्हयातील तीनही विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या वाट्याला यावेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने पूर्व विदर्भातील मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. आमदार अभिजीत वंजारी यांच्यावर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या पाच जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला यांच्या आदेशावरून सोपविण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने आमदार अभिजित वंजारी आज गडचिरोली येथे आले असता कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

उद्या मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत आपण तसा अहवाल सुद्धा सादर करणार असल्याचीही माहिती अभिजीत वंजारी यांनी याप्रसंगी दिली. पत्रकार परिषदेला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटाराम तलांडी, सर्व विभागातील तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नक्षल प्रभावित, आदिवासीबहुल व अतिदुर्गम अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रा. ली. स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन १७ जुलैला दोन उपमुख्यमंत्री तथा उद्योग मंत्री यांच्या हजेरीत झाला असताना खासदारांना सदर कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही दिले नसल्याने त्या कार्यक्रमाबद्दल आज झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वांनी आपली नाराजी व्यक्त केली व राज्यातील महायुती सरकारचा निषेधही नोंदवला.