योजनांच्या माध्यमातून गडचिरोलीच्या विकासाला प्राधान्य देणार : पालकमंत्री एकनाथ शिंदे

154

– स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

– कृषी विभागांतर्गत विविध यांत्रिकीकरणाचे साहित्य व निधीचे वाटप

– कोविड काळात चांगले कार्य केलेल्या गावस्तरावरील कर्मचाऱ्यांचाही सन्मान

गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथे करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे फीत कापून लोकार्पण केले. यावेळी उपस्थितांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की गडचिरोलीमधील विकास हेच माझे प्राधान्य असून येत्या काळात दुर्गम भागात विविध योजना राबवून रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्धतेसाठी काम करणार आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुविधांची निर्मिती करून आरोग्यसेवा बळकट करण्यात आली आहे. पदभरतीचेही प्रश्न येत्या काळात मी सोडवणार असून, निर्माण झालेल्या सुविधा चांगल्या प्रकारे कशा लोकांच्या उपयोगी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकार्पण केलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित असून लखमापूर बोरी अंतर्गत येणाऱ्या 16 गावांमधील 17243 लोकसंख्येला त्याचा फायदा होणार आहे. तसेच या केंद्राच्या खाली एकूण 6 उपकेंद्र असणार आहेत. आज झालेल्या लोकार्पणावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटील, लखमापूर बोरी गावच्या सरपंच रेखाताई सूरजागडे तसेच इतर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे स्वरूप तसेच गडचिरोली बद्दल सद्यस्थितीची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीमधील विविध विकास कामे येत्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून सर्वांच्या समन्वयाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्याचा विकास इतर जिल्ह्याप्रमाणे करण्याकडे शासनाचा दृष्टिकोन असून रोजगार निर्मितीसह आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा बळकट करण्याकडे आमचे लक्ष आहे. गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात गेल्या दीड-दोन वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या कोरोना संसर्ग आला मात्र शासनाने आवश्यक मदत वेळत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्येही या दरम्यान चांगले कार्य झाले आहे. येत्या काळातही सर्व नागरिकांनी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लसीकरणासह संसर्ग रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी यशस्वी करून संभाव्य कोरोनाच्या लाटेलाही आपण दूर ठेवूया असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केलं.

लखमापूर बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत पाहून त्यांनी सर्व सहभागी प्रशासनाचे व गावातील नागरिकांचे अभिनंदन केले. या इमारतींमुळे आसपासच्या सोळा गावांना व सहा उपकेंद्रांना मदत होणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातून 17 हजार नागरिकांना आरोग्य विषयक लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री यांची देसाईगंज येथील एसआरपीएफ कॅम्पला भेट
चामोर्शी तालुक्यात येण्याअगोदर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी वडसा येथे एसआरपीएफ गट क्र.१३ ला आज भेट देऊन जवानांशी संवाद साधला. गडचिरोली सारख्या संवेदनशील भागात आपले कर्तव्य बजावताना ते करत असलेला संघर्ष व त्याग भावनेबद्दल त्यांचे जाहीर कौतुक केले. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.