नगरविकास मंत्र्यांचा निर्णय हा उच्च न्यायालयाचा अवमान करणारा – नगराध्यक्ष योगीता पिपरे

137

गडचिरोली : १३ ऑक्टोबर २०२१ च्या सुनावणीमध्ये माझ्यातर्फे शासकीय परिपत्रक व उच्च उच्च न्यायालयाचे निकाल जोडले असताना या कोणत्याही बाबींचा अभ्यास न करता नगरपरिषदेची निवडणूक एक महिन्यावर असताना नगरविकास मंत्री यांनी दिलेला निकाल हा राजकीय द्वेषभावनेतून आहे. यामध्ये उच्च न्यायालयाचा अवमान झालेला आहे. या चुकीच्या आदेशाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. नुकताच माझ्या पाच वर्षांंतील कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचलेला असून गडचिरोली शहरात आतापर्यंत ३० वर्षांंत जी कामे झाली नाहीत ती भारतीय जनता पार्टीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण झालेली आहेत. मी भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष असताना या पाच वर्षांमध्ये झालेली विकासकामे बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे मला व भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचे विरोधकांचे एक षडयंत्र आहे. यामुळेच नगरविकास मंत्री यांनी आपल्या राजकीय सूडबुद्धीने मला अपात्र केले आहे. त्यामुळे हा माझ्यासारख्या बहुजन समाजातील महिलांचा अपमान आहे. याचा परिणाम पुढच्या काही दिवसात येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत दिसून येणार आहे, असेही योगीता पिपरे प्रसिद्धी पत्रकात म्हणाल्या. गडचिरोली शहरातील नागरिक सुजाण आणि समजदार असून यापुढेही नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता बसणार असल्याचेही नगराध्यक्ष पिपरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.