जनआंदोलनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत यशस्वी होईल – आमदार कृष्णा गजबे

130

गडचिरोली : आज स्वच्छ भारत अभियानाने जनआंदोलनाचे रुप धारण केले आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी लक्षात घेऊन स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत विभागीय जनसंपर्क ब्युरो वर्धा आणि जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे आयोजित स्वच्छ भारत विशेष अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे आ. गजबे म्हणाले की, जनतेनेही एक पाऊल पुढे येऊन सरकारला सहकार्य करावे. प्लास्टिकचा वापर टाळावा व पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले. मानापूर ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज म्हणाले की, गावाने शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा जेणेकरून ग्रामस्थांची स्थिती सुधारू शकेल. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य संपत आडे, सरपंच कुंदाताई नारनवरे, उपसरपंच वैशालीताई खुणे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक प्रचार अधिकारी इंद्रवदन सिंग यांनी केले. संचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमित माणुसमारे, तांत्रिक सहाय्यक संजय तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामसेविका वैशाली ढोरे यांनी केले.