गडचिरोली : आदिवासी व स्थानिकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा शासनाने एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प रद्द केला नाही किंवा त्या विरोधात उचित कार्यवाही केली नाही. त्यामुळे संतप्त स्थानिक आदिवासी व वननिवासींचा सोमवार, 26 ऑक्टोबरला एटापल्लीच्या रस्त्यावर आक्रोश दिसून आला. सुरजागड पारंपरिक इलाका गोटुल समितीच्या वतीने खाणीविरोधात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सुरजागड इलाका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा यांनी केले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, शेकापचे नेते रामदास जराते, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, भामरागड इलाका प्रमुख ॲड. लालसु नागोटी, माकप नेते अमोल मारकवार यांनी मार्गदर्शन केले.