सिरोंचात पूर परिस्थिती ; 334 पूरपीडित लोकांचे स्थलांतर

180

– जिल्हा प्रशासनाद्वारे 58 शेल्टर होमची निर्मिती, निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 28 जुलै : जिल्ह्यात 27 जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने सिरोंचा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या पुरात अडकलेल्या व पुरामुळे धोका होऊ नये, अशा संभाव्य गावातील लोकांसाठी जिल्हा प्रशासनाने शेल्टर होम तयार केले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पूरपिडीत 334 लोकांना या शेल्टर होममध्ये स्थलांतरीत केले असून त्यांच्यासाठी निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यात एकूण 58 शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शेल्टर होममध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरपंच व उपसरपंच याप्रमाणे 58 पथक तयार करण्यात आले आहेत. 27 जुलैला सिरोंचा तालुक्यातील नगरम, मुगापूर, जानमपल्ली व सिरोंचा (रै.) येथील पुरबाधित लोकांना शेल्टर होममध्ये हलविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरम येथील 240 लोकांना शासकीय आश्रमशाळा, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये, मुगापूर व जानमपल्ली येथील 90 लोकांना कॉरमेल हायस्कुल राजीवनगर, सिरोंचा येथे तर सिरोंचा (रै.) येथील 4 लोकांना जिल्हा परिषद हायस्कुल, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये आणण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे नागरिकांच्या निवास, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येत आहे.

याशिवाय तालुक्यात एस. डी. आर. एफ.चे एक पथक आणि सी. आर. पी. एफ. चे 50 जवान मौक्यावर तैनात आहेत. तसेच लाइफ जॅकेट, लाईफ बोट, मेगाफोन व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व पूरबाधित गावांमध्ये आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने कळविले आहे.