Home गडचिरोली 16 डिसेंबरला गडचिरोली येथे प्रतिभावंत महिलांचे भव्य संमेलन

16 डिसेंबरला गडचिरोली येथे प्रतिभावंत महिलांचे भव्य संमेलन

118

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : समाजातील विविध क्षेत्रात कर्तृत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या प्रतिभावंत महिलांचे भव्य संमेलन १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात घेण्यात येणार आहे.

स्त्रीचं कुटुंबातील स्थान महत्त्वपूर्ण असून घर ही संकल्पनाच स्त्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तिला संधी मिळाली की ती देश व विश्वपातळीवरही नेतृत्त्व करण्याची क्षमता ठेवते. काही महिलांनी अत्यंत कष्ट घेऊन आपल्या उर्जाशक्तीने या संधी खेचून आणलेल्या आहेत. भारतीय इतिहासात अजरामर झालेल्या कर्तृत्त्ववान महिलांचे कार्य आणि जीवनप्रवास आजही समस्त महिलांसाठी प्रेरणादायी आहे. गार्गी, मैत्रेयी, गौतमी, संघमित्रा, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, चिन्नम्मा अशा अनेक स्त्रियांनी आदर्श इतिहास रचलेला आहे. भारताला समर्थ करण्यामध्ये त्यांनी योगदान दिले आहे. भारताच्या अमृत काळातही महिला शक्तीचे योगदान समर्थ भारताच्या समृद्धीकरिता होत आहे. समाज व राष्ट्रविकासात स्त्रियांमध्ये असणाऱ्या क्षमतेचा व ऊर्जा शक्तीचा योग्य उपयोग व्हावा व संपूर्ण समाजाला त्यातून प्रेरणा मिळावी. राष्ट्र उभारणीमध्ये महिलावर्गाचा सहयोग घेता यावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षापूर्वी संपूर्ण देशामध्ये महिलांचे संमेलन आयोजन करण्यात येत आहे.

भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वासाठी दिशादर्शक आहे मग ते कोणतेही क्षेत्र असो. यामध्ये नवीन आणि प्राचीन चिंतनाचा वेध घेतलेला आहे. हे चिंतन अत्यावश्यक असून ते शाश्वत आहे. याचाच परिणाम म्हणून मानव हिताचा विचार करणारे विश्वातील समस्त विचारवंत भारताकडे सकारात्मक दृष्टीने बघतात. या देशाची सभ्यता, संस्कृती, कुटुंब व्यवस्था, वैचारिक पातळी, प्राचीन शिक्षण प्रणाली व अर्थव्यवस्था जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. संपूर्ण सृष्टीचा विचार करता स्त्री ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. जिच्यामध्ये माया, ममता, सौंदर्य, सहनशीलता, शुचिता, अलौकिक बुद्धिमत्ता, असामान्य क्षमता अशा अनेक गुणांचा संगम आढळतो. पुरुषांमध्येही अनेक गुणांचा संगम आहे हे नाकारता येणार नाही. स्त्री-पुरुष ही दोन्हीही संसाररूपीरथाची चाके आहेत असे म्हटले जाते. ते एकमेकांना पूरक आहेत. भारतीय चिंतनामध्ये सर्व स्तरावर स्त्रीला तिचा सन्मान आणि हक्क मिळाले पाहिजे. महिलेला तिचे अधिकार आणि सन्मान योग्यरित्या दिला गेला तर ती नंदनवन फुलवू शकते.

भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तीला विशेष स्थान प्राप्त आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हटले जाते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये ‘महिलोन्नती’ हा अध्यायच लिहिलेला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ”जिच्या हाती पाळण्याची दोरी | ती जगाते उद्धारी | ऐसी वर्णिली मातेची थोरी | शेकडो गुरुहूनी || मातेच्या स्वभावे पुत्राची घडण | त्यास उज्वल ठेवी तिचे वर्तन |” वेदांपासून स्त्रीचा गौरव होत आलेला आहे. गुरुला सुद्धा माऊलीचे रूप दिले जाते. ज्या ईश्वराला आपण स्मरतो त्यालाही आपण माऊली म्हणतो. मातृत्व ही जगातली सर्वोच्च भावना असून मानवी जीवनातील सर्वोत्कृष्ट भूमिका आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून देशभरामध्ये सर्वत्र महिला संमेलनांचे आयोजन केले गेलेले आहे. आपल्या गडचिरोली शहरात आपल्याच भागातील महिलांनी एकत्र येऊन या संमेलनाची जीव ओतून तयारी केलेली असून आपल्या ऊर्जा शक्तीची सगळी क्षमता पणाला लावली आहे. या संमेलनाला मोठ्या संख्येत महिलांनी यावे व लाभ घ्यावा, असे महिला समन्वय समितीचे आवाहन आहे.

समाजातील विविध क्षेत्रात सक्षमपणे कार्य करणा-या आणि देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचे संमेलन महिला समन्वय समितीच्या वतीने शनिवार, १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात होणाऱ्या या संमेलनाला विविध क्षेत्रातील सुमारे १५०० नेतृत्वधारी महिला सहभागी होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून प्रमुख अतिथी म्हणून ईशा पोरड्डीवार नागपूर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ता म्हणून नागपूरच्या डॉ. कल्पना पांडे उपस्थित राहतील. त्या ‘भारताचे महिला विषयक चिंतन’ या विषयावर भाष्य करतील. उद्घाटन सत्रानंतर ‘महिला पंचायत’चे आयोजन करण्यात आले असून यात ‘स्थानीय महिलांच्या समस्या, स्थिती आणि समाधान’ या विषयावर चर्चा होणार आहे. समापन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधुरी किलनाके आणि रुपाली पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्राला प्रमुख वक्ता रमा गोळवलकर राहतील. याशिवाय संमेलनस्थळी प्रदर्शनी, साहित्य विक्री, नृत्याविष्कार अशा विविध गोष्टींचे आकर्षण राहणार आहे.

error: Content is protected !!