8 लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

174

– नक्षल सप्ताहाच्या पा पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २४ जुलै : 8 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. अडमा जोगा मडावी (वय 26 वर्ष रा. जिलोरगडा, पो. पामेड तह. ऊसुर, जि. बिजापूर (छ.ग.) व टुगे कारू वड्डे (वय 35 वर्ष रा. कवंडे, पो. बेद्रे, तह. बैरामगड, जि. बिजापूर (छ.ग.) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यांची नावे आहेत. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने यशस्वी कामगिरी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आज पोलीस अधिक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी हे नक्षल शहिद सप्ताह पाळतात. या सप्ताहामध्ये नक्षलवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे, खबरी असल्याच्या संशयावरुन निष्पापांच्या हत्या करणे, रस्ते बंद करणे, बंद पुकारणे, धमकावणे, जनतेकडून पैसा वसूल करणे, ठेकेदाराकडून खंडणी गोळा करणे अशा हिंसक कारवाया करत असतात. शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा आणि हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत असल्याचे श्री. नीलोत्पल यांनी सांगितले.

आत्मसमर्पीत नक्षल सदस्य अडमा जोगा मडावी हा जुलै 2014 ला पामेड एलजीएसमध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2021 पर्यंत कार्यरत होता. जानेवारी 2021 ला झोन अॅक्शन टीममध्ये बदली होवून कार्यरत राहून जून 2023 ला दलम सोडून घरी परत आला. या कालावधीत 8 चकमकी, 5 खून, 1 जाळपोळ व इतर 2 गुन्ह्रात त्याचा सहभाग होता. सन 2016 मध्ये बोटेतोंग जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. तसेच 2017 मध्ये बुरकापाल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी असून यात सीआरपीएफचे सन 25 जवान शहीद झाले होते. चिन्ना बोडकेल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी असून यात पोलीस पार्टीचे 2 जवान शहीद व 5 जवान जखमी झाले होते. तसेच सन 2018 मध्ये मुरडोंडा रोडवर झालेल्या भूसुरुंग स्फोट (एमपीव्ही) मध्ये त्याचा सहभाग असून त्यात पोलीस पार्टीचे 2 जवान शहीद व 5 जवान जखमी झाले होते. यासोबतच सन 2018 मध्ये झारापल्ली जं. प. चकमकीमध्ये त्याचा सहभाग असून यामध्ये पोलीस पार्टीचे 3 जवान शहीद 7 जवान जखमी व कोंडास्वाल रोडवर चकमक/हमल्यामध्ये पोलीस पार्टीचे 1 जवान शहीद झाले होते.  सन 2020 मध्ये एर्रान जंगल परिसरातील चकमकीमध्ये त्याचा सहभाग असून यामध्ये पोलीस पार्टीचे 2 जवान शहीद व 7 जवान जखमी झाले होते. मिनपा चकमक/हमल्यामध्ये त्याचा सहभाग असून त्यात पोलीस पार्टीचे 17 जवान शहीद व 20 पोलीस जवान जखमी झाले होते.

तसेच सन 2018 मधील झारा (कुतुल एरिया) येथील 1 इसम, सन 2020 मधील गुमगुडेम येथील 1 इसम, गोंडभटुम येथील 1 इसम व कोमाट येथील 1 इसम तर सन 2023 मधील झारा (नेलनार) येथील 1 इसम अशा एकुण 5 निरपराध इसमांच्या खुनात तो प्रत्यक्षरित्या सहभागी होता. सन 2022 मध्ये झोरी येथील रोड कामावरील 2 (1 ट्रक व 1 टेम्पो) वाहनांची जाळपोळ, सन 2015 मध्ये पामेडपासून तेलंगणाकडे जाणाऱ्या रोडवर तसेच सन 2023 मध्ये ओरच्छा ते धनोरा (छ. ग.) रोडवर खोदकाम करण्यात त्याचा सहभाग होता.

दुसरा आत्मसमर्पीत नक्षली टुगे कारू वड्डे हा सन 2012 ला जाटपूर दलम जनमिलीशीय सदस्य पदावर भरती होऊन सन 2023 पर्यंत कार्यरत राहुन घरी परत आला होता. त्याचा 6 खुनाच्या गुन्ह्यात तर सन 2022 मध्ये ईरपनार (म. रा.) येथील रोड कामावरील 12 (ट्रॅक्टर, जेसीबी) वाहनांची जाळपोळीच्या घटनेत सहभाग होता. नक्षल चळवळीत काम करीत असताना वरिष्ठ कॅडरच्या माओवाद्यांची कामे करणे, पैसा गोळा करणे, अहोरात्र भटकंतीचे जीवन जगणे या त्रासाला कंटाळून त्या दोघांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

दीड वर्षात 12 जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

महाराष्ट्र शासनाने अडमा जोगा मडावी याच्यावर 6 लाख रूपयांचे तर टुगे कारू वड्डे याच्यावर 2 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून अडमा जोगा मडावी यास 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले तर टुगे कारु वड्डे याला 4 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. माओवाद्यांच्या खोट्या व फसव्या तथाकथीत क्रांतीला बळी पडू नये. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे व शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2023 या दीड वर्षात एकुण 12 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता उपस्थित होते.