– असरअल्ली – पातागुडम मार्गावरील घटना, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २३ जुलै : सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली – पातागुडम मार्गावरील फारेस्ट नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून चारचाकी वाहनातून तस्करी केला जाणारा १५ लाख रुपये किंमतीचा १५० किलो अंमली पदार्थ (गांजा) आज, २३ जुलै रोजी जप्त करून मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गांजाची तस्करी करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असरअल्ली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावळे यांना आज छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजा) असरअल्लीकडे येत असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे असरअल्ली – पातागुडम मार्गावरील फारेस्ट नाक्याजवळ सापळा रचला. दरम्यान, सदर वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता सदर वाहन रोडच्या खाली उतरवून वाहनातील एक महिला व एक पुरुष यांनी पळ काढला असता पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने सदर महिला व पुरुषाला पकडले. त्यानंतर सदर वाहनाची पाहणी केली असता कारच्या मागील डिक्कीमध्ये ३६ लहान बॉक्स आढळून आले. सदर बॉक्समध्ये अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचा १५० किलो अंमली पदार्थ (गांजा) व ५ लाख रुपये किंमतीची रेनोल्ट डस्टर कार (क्र. एम. एच. ३४ एम. ५५०१) असा ऐकून 20 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. सदर मुद्देमाल असरअल्ली पोलीस स्टेशन येथे आणून आरोपी शिव विलास नामदेव व ज्योती सत्येंद्र वर्मा (दोन्ही रा. उत्तरप्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास असरअल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावळे करीत आहेत.
सदर कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख, सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असरअल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावळे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी जगन्नाथ कारभारी, पोलीस अधिकारी दिलीप उईके, पोलीस अधिकारी शंकर सलगर, पोलीस अधिकारी आदिनाथ फड यांनी पार पाडली.