10 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक : गडचिरोली पोलिसांना मोठे यश

203

– अटकेतील नक्षलवाद्यांचा खून, जाळपोळ, चकमकीत सक्रीय सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा उपविभागाअतर्गत येणाऱ्या पोमके सावरगाव परिसरात 7 ऑक्टोबर रोजी नक्षलविरोधी अभियानादरम्यान 10 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सावरगाव परिसरात नक्षलविरोधी राबवित असताना 2 संशयित व्यक्ती आढळले. त्यांची चौकशी केली असता ते नक्षलवादी असल्याचे समजले. त्यावरून त्यांना अटक केली. सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामराव नरोटे वय 24 रा. मोरचुल, ता. धानोरा व समुराम ऊर्फ सुर्या घसेंन नरोटे वय 22, रा. मोरचुल, ता. धानोरा, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. सनिराम नरोटे हा ऑक्टोबर 2015 मध्ये टिपागड दलममध्ये झाला व डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून 2018 पर्यंत कार्यरत होता. ऑगस्ट 2018 ते 2020 पर्यंत कंपनी 10 मध्ये कार्यरत होता. 2020 ते आतापर्यंत पीपीसीएम म्हणून कंपनी 10 मध्ये असून महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच समुराम नरोटे हा जन मिलिशिया सदस्य असून महाराष्ट्र शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सदर दोन्ही नक्षलवाद्यांचा खून, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्ह्यांत सहभाग असून त्यांचा तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. त्यांना वरिष्ठ नक्षल कॅडरकडून उत्तर गडचिरोलीमध्ये दलम पूर्ववत करण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी सांगितले.
सदर कारवाई आपल्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडल्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.