Home गडचिरोली चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रकल्प अधिकाऱ्यांचा दिलासा

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रकल्प अधिकाऱ्यांचा दिलासा

15

– समस्या सोडविण्याचे आश्वासन ; आश्रमशाळा संघटनेने सादर केले मागण्यांचे निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी आश्रमशाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यामुळे प्रकल्पातील समस्याग्रस्त चतुर्थश्रेणी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.

सीटू संलग्नित आदिवासी विकास चतुर्थश्रेणी व रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संतोष धोटे व राधेश्याम पत्रे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन गुरुवार, ११ जून रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात निवेदनातील सर्व मागण्या व समस्या प्रकल्प अधिकारी अरुण एम.यांनी क्रमाक्रमाने जाणून घेतांना सकारात्मक प्रतिसाद दिला. वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित समस्यांबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सादर केलेल्या निवेदनात ज्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेश मिळाले नाही त्यांना लवकर गणवेश देण्यात यावे,चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात यावी, चौकीदार कर्मचाऱ्यांना गम बूट, टॉर्च, छत्री देण्यात यावी, प्रत्येक आश्रमशाळेत महिला चौकीदार, महिला सफाईगार यांची नियुक्ती करावी, मागील १० ते १५ वर्षापासून काम करीत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन कामावर घेण्यात यावे,रोजंदारी कर्मचाऱ्यांना मजुरीचे दर सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे ५६१ रुपये प्रती दिवस देण्यात यावे, २०० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांना नियमानुसार ज्यादा कर्मचारी देण्यात यावे, ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेची १० वर्ष पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात यावी,रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

निवेदन सादर करतांना शिष्टमंडळात सुभाष देवाजवार, कविता मेश्राम, घनश्याम मोहरले, बाबूदास हलामी, विजू मानकर, रवीना दहागावकर, महेंद्र नंदेश्वर आदींसह चतुर्थ श्रेणी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!