विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील इंद्रावती नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाविरोधात जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती, महाराष्ट्रच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहेरी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीत पोकलेन मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. त्यामुळे नदीपात्राचे नुकसान होत आहे. तसेच संबंधित विभागांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांना बांधकामासाठी रेती मिळण्यात अडचणी येत असताना मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान नदीपात्रात सुरू असलेले उत्खनन पाहिल्याचा दावा केला असून तेलंगणा राज्यातील वाहनांद्वारे रेती वाहतूक केली जात असल्याचेही नमूद केले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. तसेच अवैध रेती व वाहने जप्त करावीत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणासह शासकीय महसुलाचेही नुकसान होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही होत आहे.





