Home गडचिरोली बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी : रेखाताई डोळस

बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी : रेखाताई डोळस

23
Oplus_16908288

(वाढदिवस विशेष)

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आपलं घर, आपला संसार सांभाळत दोन मुलांना इंजिनिअर बनवून गृहिणी, सामाजिक कार्यकर्त्या, ते भारतीय जनता पक्षात राजकीय पुढारी असे विविधांगी कार्य करून एक यशस्वी महिला अशी गडचिरोली जिल्ह्यात रेखाताई डोळस यांची ओळख आहे.

रेखाताई डोळस यांचा राजकीय प्रवास केवळ पद किंवा सत्तेसाठी नाही तर संघटनेसाठी व जनसेवेसाठी आहे. निष्ठा, निःस्वार्थ सेवा आणि पक्षवाढीसाठी अहोरात्र झटणं हे रेखाताईंचे खरे कार्यकर्त्याचे व्यक्तिमत्व आहे. पक्षवाढ हीच खरी जबाबदारी समजून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमातून पक्षाचा झेंडा दुर्गम भागात रोवला. एवढंच नाही तर रेखाताईंनी नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य केले. मुलींचे कबड्डी सामने, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या अनेक योजना त्यांच्या बांधापर्यंत व त्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यासाठी भरीव कार्य केले आहेत.

रामदेवबाबा यांच्या समितीच्या माध्यमातून विविध रोगनिदान शिबिर घेऊन व्यायामाची गोडी जनसामान्यांमध्ये विशेषत: महिलांमध्ये निर्माण केली. गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल असल्याने आदिवासी समाजातील मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांचे सुप्त गुण जनतेपुढे यावे, आदिवासी मुलांमुलींचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रेखाताई डोळस यांनी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मुद्रा कमिटीवर त्या सदस्य असताना सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी जास्तीत जास्त कर्ज कसे मिळेल आणि त्यांचा रोजगार भरभराटीला कसा येईल यासाठी अनेक बँकांचे मेळावे घेऊन अनेक बेरोजगारांना त्यांनी मुद्रा लोन मिळवून दिले. डीआरडीए कमिटीवर त्या सदस्य असताना विशेषत: गोरगरिबांना घरकूल कसे मिळेल यासाठी आटोकाट प्रयत्न केले. गोरगरिबांना घरकुलांचा लाभ मिळावा याकरिता गडचिरोलीसाठी नियमात शिथिलता करता येईल का यासाठी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
कोरोनाच्या काळात जेव्हा नागरिक घराबाहेर पडत नव्हते त्यावेळी 182 जोडप्यांचा निःशुल्क विवाह लावून दिला. रेखाताईंचे सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये मोठे योगदान आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव म्हणून काम करताना गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची, भामरागड, शिरोंचापर्यंत अनेक आदिवासी, गैरआदिवासी, ओबीसी महिलांचे मेळावे घेऊन जनसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना कशा पोहचतील यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

आज त्यांचे नाव कणखर व निष्ठावंत नेत्या म्हणून घेतले जाते. यामागे त्यांच्या निःस्वार्थ सेवेची आणि निष्ठेची भक्कम भूमिका आहे. रेखाताईंचा 6 जून हा जन्मदिवस आहे. आदिवासी, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या रेखाताईंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

error: Content is protected !!