Home गडचिरोली ६ वर्षांपासून रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा महामार्गासाठी ‘रस्ता रोको’ आंदोलन

६ वर्षांपासून रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा महामार्गासाठी ‘रस्ता रोको’ आंदोलन

17

– मोसम फाटा येथे जनक्षोभ ; सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात ‘आता नाही तर कधीच नाही’चा नारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आलापल्ली-सिरोंचा महामार्गाच्या दुरवस्थेने हतबल झालेल्या नागरिकांनी अखेर संघर्षाचे पाऊल उचलले आहे. मोसम फाटा येथे २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या ‘रस्ता रोको’ आंदोलनाने प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. ६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे परिसरातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, संतापलेल्या जनतेने आता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रियाज शेख आणि युवा शक्ती संघटना, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, स्थानिक जनसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. या आंदोलनात परिसरातील शेकडो तरुण, जेष्ठ नागरिक, व्यापारी आणि मुख्यत्वे करून त्रस्त असलेले वाहनचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
१. कामाला तत्काळ सुरुवात : कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरण सुरू करा.

२. पावसाळ्यापूर्वी सोय : पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता किमान वाहतुकीयोग्य करावा.
३. दोषींवर कारवाई : ६ वर्षे काम रखडवणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.

या आंदोलनाची तीव्रता पाहून संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, “आम्ही फक्त आश्वासनांवर उठणार नाही, आम्हाला लेखी आश्वासन आणि कामाची तारीख हवी,”असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास पुढील आठवड्यात यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सर्वानुमते देण्यात आला.

“हा रस्ता म्हणजे आमचा श्वास आहे, पण गेल्या ६ वर्षांपासून प्रशासन आमचा गळा आवळत आहे. आज केवळ रस्ता रोको केला आहे, वेळ आल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊ!”
– सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार

यावेळी नायब तहसीलदार एन. सी. दाते, राष्ट्रीय महामार्ग अभियंता आशिष घोनमोडे, कंत्राटदार प्रतिनिधी, पीडब्ल्यूडी कन्सल्टन्सी अधिकारी रामजी यादव आणि अहेरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त उपस्थित होता. या आंदोलनामुळे काही काळ आलापल्ली-सिरोंचा वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र जनतेचा रोष पाहता पोलिसांनीही सामंजस्याची भूमिका घेतली.

error: Content is protected !!