– आदिवासी विकास विभाग ; पाच बिटातील ३०० खेळाडूंचा विविध खेळात सहभाग
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या आदिवासी विकास विभाग कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी कोरची तालुक्यातील कोटगुल येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या मैदानावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून थाटात पार पडले.
यावेळी सहउद्घाटक म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोटगुल येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनसिंग मडावी होते. विशेष अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी नरेंद्र कावळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ग्यानसिंग नैताम, पोलीस पाटील भागवत कोल्हे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप कोवाची, राजेश नैताम, मुकेशदादा नरोटे, मीराबाई दूधकवर, कार्यालय अधीक्षक वासुदेव उसेंडी, पीएसआय कृष्णा सोळुंके, दादाजी सोनकर, विभा बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचारी रजाऊराम मुलेटी यांचा शाल व श्रीफळ देऊन सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा दरवर्षीच होतात. या विभागाच्या गडचिरोली प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे मात्र पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे.
कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील कर्मचारी, २१ शासकीय वसतीगृह,प्रकल्प कार्यालयासह जात पडताळणी कार्यालयातील सुमारे तीनशे कर्मचारी सदर प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनात उत्साहाने सहभागी झाले आहेत.
उद्घाटनीय व्हॉलीबॉलचा सामना कारवाफा व सोडे या बिटा दरम्यान झाला. यात कारवाफा बिट विजयी झाला.
कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, गोळाफेक, भालाफेक, धावणे या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.एम.कुळसंगे यांनी केले. संचालन डी. बी. पदा तर आभार प्रदर्शन विभागीय क्रीडा उपसमन्वयक नेताजी गावड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, समन्वयिका प्रमिला दहागावकर, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, क्रीडा मार्गदर्शक आशिष नंदनवार, अधीक्षक पी. एन. पडवे, अधीक्षिका एस. सी. चवरे, ए. एस. करंगामी, मोहिनी कडते आदींसह कोटगुल शाळेतील व पाचही बिटातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.







